रत्नागिरी - वाशिष्ठी नदीला पूर आल्याने चिपळूण शहराला पुराचा वेढा कायम आहे. बसस्थानक, चिंचनाका, चिपळूण बाजारपेठत पुराचे पाणी घुसले आहे. सकाळपासून पावसाने चिपळूणला झोडपून काढले आहे. त्यामुळे चिपळूणमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
कोळकेवाडी धरणातून पाणी सोडल्याने आणि भरतीमुळे वाशिष्ठीच्या पुराच्या पाण्याला फुगवटा वाढला आहे. सध्या पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला आहे. दरम्यान, या परिस्थितीची पाहणी प्रशासन तसेच आमदार सदानंद चव्हाण यांच्याकडून करण्यात आली. गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन आमदार चव्हाण यांनी केले आहे. या पूर परिस्थितीबाबत आमदार सदानंद चव्हाण यांच्याशी बातचीत केली आहे आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..