रत्नागिरी - सलग दुसर्या दिवशी मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले आहे. शनिवारी सायंकाळपासूनच वेगवान वार्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्रभर पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून रविवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी 97.24 मिमी पाऊस झालाय. त्यात मंडणगड 81.20, दापोली 62.90, खेड 133.60, गुहागर 99.30, चिपळूण 128, संगमेश्वर 105.10, रत्नागिरी 82.60, लांजा, 87.20, राजापूर 85.30 मिमी नोंद झाली. रविवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता.
पावसाचा सर्वाधिक तडाखा चिपळूणला बसला आहे. वाशिष्ठी नदीला आलेल्या पुराचे पाणी मध्यरात्री शहरात शिरले. त्यामुळे शहराला पुराच्या पाण्याने वेढलं होतं. वाशिष्ठीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथील पूल शनिवार रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. रविवारी दुपारी पूल वाहतुकीसाठी सुरू झाला. दरम्यान चिपळूणातील पूर परिस्थिती दुपारनंतर ओसरली. पण सखल भागात पाणी साचले होते.
संगमेश्वर तालुक्यातील गडनदीला आलेल्या पुरामुळे माखजन बाजारपेठेत पाणी घुसले होते. या वर्षातील ही दुसरी वेळ आहे. मुसळधार पावसाचा जोर कायम राहिल्यास गडनदी किनारी असलेल्या गावांना पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. राजापूरमधील अर्जुना नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुराचे पाणी जवाहर चौकात शिरण्याची शक्यता आहे. सायंकाळपर्यंत पुराचे पाणी दुकानांपर्यंत आले होते. त्यामुळे व्यापार्यांनी साहित्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीही दुथडी भरुन वाहत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणी किनार्यावरील भागात घुसण्याची शक्यता आहे. आठ दिवसांपूर्वी काजळीच्या पुरामुळे सहा गावे बाधित झाली होती. लांजा, खेड, गुहागर, मंडणगडसह दापोली तालुक्यातही मुसळधार पावसासह वेगवान वारे वाहत आहे.
पावसाचा जोर सोमवारपर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने किनारी भागातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.