रत्नागिरी - जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झालीय. मतमोजणी केंद्रांबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. जिल्ह्यात 360 ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडले होते. या सर्व ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सकाळी दहा वाजेपासून सुरूवात झालीय. मतमोजणी केंद्रांबाहेर कार्यकर्ते आणि उमेदवारांची गर्दी बघायला मिळतेय. निवडणूक निकालांकडे उमेदवार, कार्यकर्त्यांसह नागरिकांचे लक्ष लागून आहे.
राजापुरात ग्रामपंचायत निवडणुकीत सेनेला मोठा धक्का
राजापुरातील कोंडसरबुदुक ग्रामपंचायतीत बीजेपी पुरस्कृत गावपॅनलचे ११ सदस्य विजयी. जिल्हा परिषद सदस्य आणि माजी शिक्षण सभापती दीपक नागले यांचे हे गाव आहे. सेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. याशिवाय मंत्री उदय सामंत यांच्या पाली ग्रामपंचायतीत मात्र सेनेचं वर्चस्व बघायला मिळालं.
रत्नागिरी तालुक्यात शिवसेनेची बाजी
रत्नागिरी तालुक्यात ग्रामपंतायती निवडणुकीत शिवसेनेनं बाजी मारलीय. कर्ला, कळझोंडी ग्रामपंचायतीवर शिवसेनेनं आपला झेंडा फडकावलाय. तर ओरी आणि काळबादेवी ग्रामपंचायत गाव पॅनलकडे गेलीय. ओरी ग्रामपंचायतीत गावपॅनलला 7 जागा मिळाल्या. सावर्डे ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांचे निर्विवाद वर्चस्व बघायला मिळाले. 9 पैकी 9 जागांवर आमदार शेखर निकम यांच्या पॅनलचे उमेदवार विजयी झाले. सावर्डे ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार शेखर निकम यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
हेही वाचा - राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज