रत्नागिरी - लांजा तालुक्यातील व्हेळ गावात जमीन आणि घराच्या वादातून पुतण्याने चुलता आणि चुलतीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. व्हेळ गावातील सडेवाडीमध्ये शनिवारी ही घटना घडली.
चुलता आणि पुतण्या हे दोघे एकाच घरात मात्र वेगवेगळ्या खोल्यात राहतात. जागा, जमीन आणि घरावरून या दोघांमध्ये खटके उडत असत. शनिवारी सकाळी चुलता आणि चुलती गुरे गोठ्यात बांधून घरी येत असतानाच पुतण्याने भांडण काढून वाद घालायला सुरुवात केली. त्यानंतर हाणामारी करून संतापलेल्या पुतण्याने आपल्या चुलत्याच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला. त्यांना सोडवण्यासाठी आलेल्या चुलतीला ढकलून दिल्याने ती जवळच असलेल्या बांधावर पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचाही मृत्यू झाला. या घटनेत दोन्ही चुलता आणि चुलती हे दोघे जागीच मृत झाले.
या घटनेतील संशयित आरोपी प्रतीक चंद्रकांत शिगम (वय २२) याने संतापाच्या भरात केलेल्या या कृत्यामुळे चुलता एकनाथ धकटु शिगम (वय ६०)आणि चुलती वनिता एकनाथ शिगम (वय ५४) या दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकनाथ शिगम आपल्या पत्नी आणि मुलीसोबत व्हेळ सडेवाडीत राहत होते. गेल्या वर्षभरापूर्वीचआपल्या आई-वडिलांना मुंबईत सोडून त्यांचा मुलगा म्हणजेच प्रतीक हा व्हेळ सडेवाडीत राहायला आला. थोडे दिवस तो व्यवस्थित राहिला. त्यानंतर त्याला दारुचे व्यसन लागले होते. त्यामुळे तो अधून-मधून या दाम्पत्यासोबत जमीन व जागेवरून वाद घालत असे. परंतु तो एवढा टोकाला जाईल आणि अशी घटना घडेल याची थोडी देखील कल्पना या दाम्पत्याला आली नाही. आज ना उद्या समजेल, तो लहान आहे असे समजून त्यांनी पुतण्याकडे दुर्लक्ष केले . त्यामुळे त्यांनी त्याची कोठेही तक्रार केली नव्हती.
या घटनेची माहिती जवळच्या आरगाव पोलीस पाटील यांनी लांजा पोलिसांना दिली. त्यानंतर लांजा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. संशयित आरोपी प्रतीक शिगम याला ताब्यात घेतले. त्यानंतर घटनास्थळावर पंचनामा करून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास लांजा पोलिसांसह रत्नागिरीचे स्थानिक गुन्हा अन्वेषण अधिकारी करत आहेत.