रत्नागिरी : बाप्पाच्या आगमनाची प्रतिक्षा अखेर आज संंपली. कोकणात आजचं वातावरण बाप्पामय झालं आहे. कोरोनाचं सावट असलं तरी गणेश भाविकांचा उत्साह काही कमी झालेला नाही. घरगुती गणपतींना कोकणात विशेष महत्व आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही गाजावाजा न करता अगदी साध्या पद्धतीने गणपती बाप्पाचे आगमन स्वागत कोरोनाचे शासकीय नियम पाळून घरोघरी व सार्वजनिक उत्सव ठिकाणी केलं जात आहे.
1 लाख 66 हजार 539 घरगुती व 108 सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना
आज जिल्हाभरात सर्वत्र बाप्पाचे स्वागत होत आहे. सुमारे 1 लाख 66 हजार 539 घरगुती व 108 सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होत आहे. कोकणात घरगुती गणपतींचं महत्व वेगळं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अनेकांनी मूर्ती काही दिवस अगोदर घरी नेल्या आहेत. तर अनेकांनी आज भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी गणरायाची मूर्ती घरी नेली. गणेशचित्र शाळेत आलेल्या गणेश भक्तांकडून बाप्पाला यावर्षी कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी साकडं घालण्यात आलं. दरम्यान गणेशचित्र शाळेतून गणपती मूर्ती घरी नेताना वेगळी परंपरा कोकणात पाहायला मिळते. बाप्पाला घरी नेताना गणेश मुर्ती शाळेत पानाचा विडा, सुपारी आणि दक्षिणा ठेवून गणपती बाप्पाचा जयघोष करुन आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती घरी आणली जाते.
गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्याकरिता जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. यावर्षी कोरोनाच्या नियमामुळे काही सार्वजनिक उत्सव रद्द करण्यात आले आहेत. तरी देखील एकट्या रत्नागिरी शहरात २३ सार्वजनिक गणेशोत्सव होणार आहेत.
हेही वाचा - अरे व्वा! बंगाली मूर्तिकाराने महाराष्ट्रात बनवला साबुदाण्यापासून गणपती, मध्य प्रदेशात होणार स्थापना