रत्नागिरी - राज्य मंत्रिमंडळाचं अखेर खातेवाटप झालेलं आहे. मात्र विस्तारानंतरही खातेवाटपाला झालेला विलंब, नाराजीनाट्य यावरून विरोधक सरकारवर जोरदार प्रहार करत आहेत. माजी खासदार निलेश राणे यांनीही यावरून सरकारवर टीका केली आहे. हे मंत्रिमंडळ म्हणजे चायनामेड मंत्रिमंडळ असल्याची टीका निलेश राणे यांनी केली आहे.
इथून तिथून उचललं आणि स्वस्त कॅबिनेट वाटप केले. सोईचं राजकारण जिथं जमलं त्या माणसाला मंत्री केले असल्याची टीका निलेश राणेंनी केली. या कॅबिनेटकडून फार अपेक्षा नसल्याचा टोलाही राणेंनी यावेळी महाविकास आघाडीला लगावला आहे. सरकारमधला प्रत्येक पक्ष भुकेलेला आहे, भुक जास्त लागली म्हणून या तीन पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन केले असल्याची टीकाही त्यांनी केली.
निलेश राणेंनी कॅबिनेट मंत्रीपद मिळालेल्या उदय सामंत यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. मिलिंद नार्वेकर आणि उद्धव ठाकरेंना करोडो रुपये दिल्याने सामंतांंना मंत्रीपद मिळाल्याचा आरोप करत, दिलेले पैसे मिळालेल्या मंत्रीपदातून वसूल कसे करायचे याचाच विचार उदय सामंत करत असणार, अशी टीकाही निलेश राणेंनी केली.
महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपासह इतर सर्व मुद्द्यांवर निलेश राणेंशी खास बातचित केली आहे, आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.