रत्नागिरी - विहिरीत पडलेल्या बिबट्याला १२ तासाच्या अथक प्रयत्नानंतर जीवदान देण्यात वन विभागाला यश आले आहे. राजापूर तालुक्यातील कोंड्ये बेंद्रेवाडीत ही घटना घडली आहे.
आत्माराम बेंद्रे यांच्या शेतातील विहिरीत रविवारी रात्री भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या ५० फूट खोल विहिरीत पडला आणि जोरजोरात ओरडू लागला. ग्रामस्थांनी बिबट्याचा आवाज ऐकून विहिरीत डोकावून पाहिले तर बिबट्या विहिरीत पडलेला आढळला. वनविभागाला याबाबतची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच तातडीने वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
हेही वाचा - रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूक : मतदानासाठी मतदारांचा प्रचंड निरुत्साह; फक्त 47.38 टक्के मतदान
वन विभागाने प्रथम फळीचा तराफा खाली विहिरीत सोडला. बिबट्या त्या तराफ्यावर बसला होता. रात्र असल्याने त्याला बाहेर काढणे कठीण होते. अखेर सकाळी विहिरीत पिंजरा सोडण्यात आला. तब्बल १२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. बिबट्याची तपासणी केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
हेही वाचा - 'फडणवीस सरकारच्या काळातील कर्जमाफीची चौकशी करावीच'