रत्नागिरी - कोंबडीला खाणाऱ्या अजगराला मारून त्याला अर्धवट जाळून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणं राजापूरमधील तिघांना चांगलंच महागात पडलं आहे. याप्रकरणी नाटे पडवणेवाडी येथील तिघांना वनविभागाने ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. राजापूर तालुक्यातील नाटे पडवणेवाडी येथे ही घटना घडली.
तिघांना घेतले ताब्यात -
विजय पारकर (५३), वंदना पारकर (४४) आणि मानसी पारकर (२७) यांनी मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अजगराला कोंबडीला खाताना पाहिले. त्यांनी या अजगराला लोखंडी कावरच्या साहाय्याने मारले. त्यानंतर नारळाच्या झावळाच्या साह्याने त्याला जाळले. या घटनेचा त्यांनी व्हिडीओही केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. अर्धवट जाळलेल्या या अजगराला आणि कोंबडीला जवळच्या ओढ्याजवळ नेऊन टाकले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओचा आधार घेत रत्नागिरी परिक्षेत्राच्या वन अधिकारी प्रियंका लगड यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत पडवणेवाडी येथे जाऊन पाहणी करून घटनेची शहानिशा केली. यावेळी आरोपींनी गुन्हा कबुल केला. वनविभागाने अर्धवट जाळलेला अजगर ताब्यात घेतले आहे. राजापूरचे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून शवविच्छेदन करून घेऊन त्याचे शव नष्ट करण्यात आले.
अशी होऊ शकते शिक्षा -
वन्यजीव अधिनियम १ ९ ७२ अंतर्गत अजगर किंवा वन्यजीवांची शिकार किंवा मारणे कायद्याने गुन्हा आहे . या कायद्याअंतर्गत ३ वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा किंवा २५००० रुपये दंड किंवा दोन्ही अशी तरतूद आहे. त्यामुळे वन्यप्राणी मनुष्यवस्तीनजीक आल्यास किंवा संकटात मारण्यापेक्षा त्यासंबंधी वनविभागास तत्काळ कळविण्यात यावे. असे आवाहन वनविभागाच्या वतीने केले आहे.
हेही वाचा - रत्नागिरीत कोरोनाचा कहर सुरूच; गुरुवारी ५४० नवे रुग्ण, २० जणांचा मृत्यू