रत्नागिरी - जिल्ह्यात आणखी 5 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 161 च्या घरात पोहचली आहे. जिल्ह्यात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे.
सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालय प्रशासनाला 10 अहवाल प्राप्त झाले. या दहा अहवालांपैकी 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी 1 रत्नागिरीतील तर 4 गुहागर येथील नागरिक आहेत. गुहागर तालुक्यात सापडलेल्या 4 पैकी एकजण वेळंब येथील असून तो भांडूप येथून आलेला आहे. तर, एक मुसलोंडी येथील असून तो अंधेरी-मुंबई येथून आलेला आहे. अन्य दोघे हे स्थानिक असून ते पांगण तर्फे वेळंब येथील आहेत. हे दोघेही वेळंब येथील एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते.
रत्नागिरीत सापडलेला रुग्ण हा जाकादेवी येथील असून तोही मुंबई येथून आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 161 वर पोहोचली आहे. दरम्यान एकूण 63 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात आता 94 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.