रत्नागिरी - मिठाईच्या दुकानातील ढोकळा खाल्ल्याने ५ लहान मुलांना विषबाधा झाल्याची घटना खेडमध्ये घडली. विषबाधा झालेली सगळी मुले ही सुसेरी नंबर 2 येथील आहेत. या सर्व मुलांवर डेरवण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुलांच्या आजीने खेडमधील मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या मिठाईच्या दुकानातील ढोकळा आणला होता. घरी आल्यावर या मुलांनी ढोकळा खाल्ला. मात्र, त्यानंतर या मुलांना अस्वस्थ वाटू लागले. यातील ३ मुले तर बेशुद्ध असवस्थेत होती. अखेर ग्रामस्थांनी या सगळ्या मुलांना तातडीने खेड कळंबणी रुग्णालयात दाखल केले. मात्र, मुलांची तब्येत नाजूक असल्याने त्यांना खेडच्या मदत ग्रुपच्या साहाय्याने डेरवण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या मुलांवर डेरवण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.