रत्नागिरी - कोरोना विषाणूने चीन नंतर आता इतर देशांमध्ये सुद्धा शिरकाव केलेला आहे. त्यामुळे संपूर्ण जग या विषाणूमुळे भीतीच्या सावटाखाली आहे. काही ठिकाणी विमानसेवा देखील रद्द करण्यात आली आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम व्यापार जगतावरही पहायला मिळत आहे. वस्तूंच्या आयात-निर्यातीवर परिणाम झालेला आहे. विशेष म्हणजे भारतातून मोठ्या प्रमाणावर निर्यात होणाऱ्या कच्च्या माशांवरही याचा परिणाम झाला आहे. मुंबई वगळता नुसत्या कोकणातून 15 ते 16 हजार टन मासे निर्यात होत असतात. मात्र, कोरोनो व्हायरसमुळे ही निर्यात 30 ते 40 टक्क्यांनी कमी झाल्याचे रत्नागिरीतल्या गद्रे मरीन एक्स्पोर्ट प्रा. लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर अर्जुन गद्रे सांगतात.
हेही वाचा - खासदारांच्या इशाऱ्याला न जुमानता शिवसैनिकही रिफायनरी समर्थनाच्या सभेत
महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे किनारी भागात मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे. त्यातही कोकण मत्स्यव्यवसायात आघाडीवर. त्यामुळे कोकणातल्या माशांची चव अगदी सातासमुद्रापार पोहचली आहे. मोठ्या प्रमाणात मासे कोकणातून बाहेरच्या देशांत निर्यात होत असतात. बांगडा, म्हाकूल, कोळंबी व अन्य काही फ्रोजन माशांची मोठ्या निर्यात होते. माशांपासून तयार केलेले इतर पदार्थ ज्यामध्ये रेडी टू इट पदार्थही मोठ्या प्रमाणावर निर्यात केले जातात. मात्र, माशांपासून तयार केलेल्या पदार्थांच्या निर्यातीबाबत वर्षाच्या सुरुवातीला ज्या बैठका होतात, त्या बैठका या कोरोना व्हायरसमुळे रद्द झाल्या आहेत. त्याचा परिणाम येत्या दोन महिन्यात दिसून येईल असे गद्रे मरीन एक्स्पोर्ट प्रा. लि. चे मॅनेजिंग डायरेक्टर अर्जुन गद्रे सांगतात.
हेही वाचा - रिफायनरी समर्थन मेळाव्याला गेलेल्या शिवसैनिकांवर कारवाई होणार!
जे देश फ्रोजन मासे भारतातून आयात करतात, ही फ्रोजन माशांची माशांची आयात 30 ते 40 टक्क्यांनी घटली आहे. विशेष म्हणजे एकट्या चीनमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त निर्यात या फ्रोजन माशांची भारतातून होत असते. मात्र, कोरोना विषाणूचे मुळ केंद्रच चीन असल्यामुळे फ्रोजन माशांच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे मासे निर्यातदारांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार एवढे नक्की.