रत्नागिरी - जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात 100 टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यामध्ये एकूण 2 हजार 361 सारी आणि इलीचे रुग्ण शोधण्यात आले आहेत. या रुग्णांमधून 291 कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले आहे.
कोरोना नियंत्रण अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम दोन टप्प्यात घेण्यात येत असून पहिली फेरी 10 ऑक्टोबरपर्यंत घेण्यात आली. त्यामध्ये 15 लाख 42 हजार 612 लोकसंख्या आणि 4 लाख 40 हजार 572 घरांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दीष्ट होते. त्यासाठी 686 टीममध्ये 2 हजार 29 कर्मचारी कार्यरत होते. या मोहिमेसाठी विविध प्रकारे जनजागृती करण्यात आली आहे. तसेच विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे.
तपासणीदरम्यान कोमॉर्बीड आजाराचे म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार, किडनी विकार इत्यादी प्रकारचे 1 लाख 12 हजार 79 रुग्ण आढळले. या मोहिमेअंतर्गत कोरोना रुग्णांचे निदान केल्यामुळे एकापासून दुसऱ्या व्यक्तीला आजार होण्याची साखळी खंडीत करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्यमध्ये लक्षणीय घट आढळून येत आहे. 14 ऑक्टोबर 2020 ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीत दुसरा टप्पा घेण्यात येत आहे. यामध्ये 686 पथकांमार्फत पुन्हा एकदा जिल्हयातील सर्व घरांचे पर्यायाने सर्व लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहन बने, सभापती, आरोग्य व बांधकाम सभापती महेश म्हाप व सर्व पदाधिकारी यांच्या समन्वयाने सदर मोहीम जिल्ह्यात राबविण्यात आली. जिल्ह्यातील नागरिकांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेला सहकार्य केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली आहे.
हेही वाचा - 'मास्कच सध्या एकमेव लस.. रत्नागिरीतही वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी मदत करणार'