रत्नागिरी - जिल्ह्यात सध्या महसूल व पोलीस यंत्रणेकडून संचारबंदीची अंमलबजावणी जोरात सुरु आहे. संचारबंदीच्या कालवधीत विनाकरण बाहेर फिरणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. संचारबंदी सुरू झाल्यापासून तब्बल पाच हजारापेक्षा जास्त वाहने तपासण्यात आली आहे.
दरम्यान, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण फिरणाऱ्यांविरोधात जोरदार मोहिम पोलीस तसेच महसूल प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात 83 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तर पाच हजारापेक्षा जास्त वाहने तपासण्यात आली. यावेळी 10 हजार लोकांचीही चौकशी करण्यात आली. दरम्यान विनाकारण फिरणाऱ्या 1787 वाहनचालकांकडून तब्बल 5 लाख 19 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर मास्क न वापरणाऱ्या 296 व्यक्तींना 1 लाख 51 हजार रुपयांचा दंड करण्यात आला. पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या 6 जणांची वाहने जप्त केली आहेत. तर एकावर कोविड नियम तोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात सुमारे 560 जणांची तपासणी करण्यात आली. यात 31 जण कोरोना बाधित आढळले आहेत.
हेही वाचा - LIVE MI VS DC : नाणेफेक जिंकून मुंबईचा प्रथम फलंदाजीचा निर्णय