रत्नागिरी - खेड तालुक्यातील लोटे घाणेखुंटमधील जमीन मालक शेतकरी जमिनीचा मोबदला न मिळाल्याने आक्रमक झाले आहेत. घाणेखुंट येथील महामार्ग चौपदरीकरणादरम्यान संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला अद्यापही काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. या जमिनींच्या सातबाऱ्यावर इतर हक्कांमध्ये महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे नाव असल्याने सदर शेतकऱ्यांना मोबदला अद्यापही मिळालेला ( khed Farmers deprived in land compensation ) नाही. परिणामी हे शेतकरी आक्रमक झाले असून प्रजासत्ताक दिनी उपविभागीय अधिकारी खेड यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार ( farmer hunger strike in Khed ) आहेत, यावेळी न्याय न मिळाल्यास सीटीपी प्लांट बंद करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
- प्रजासत्ताक दिनी उपोषण करण्याचा इशारा -
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चौपदरीकरणादरम्यान लोटे घाणेखुंट येथील महामार्गालगतच्या जागा संपादित करण्यात आल्या, मात्र भूसंपादनाचा मोबदला येथील काही शेतकऱ्यांना अद्यापही न मिळाल्याने शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा दिला होता. तरीही प्रशासनाने अथवा कोणत्याही संबंधित यंत्रणेने याकडे अद्याप लक्ष दिले नाही, परिणामी लोटे येथे पत्रकार परिषद घेऊन या शेतकऱ्यांनी आपली भूमिका ठाम असल्याचे पत्रकारांना सांगितले.
'...तर आम्ही लोटे सीटीपी प्लांट बंद पाडू' -
शेतकऱ्यांच्या जमिनीवर इतर हक्कांमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे नाव कोणी लावले आणि जर औद्योगिक विकास महामंडळाचे नाव शेतकऱ्यांच्या सातबार्यावर लागले असतानाही काही शेतकऱ्यांना मोबदला मिळतो आणि काही शेतकरी मोबदलापासून वंचित राहतात याचा अर्थ काय? असा सवाल केला जात आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महसूल विभाग आणि इतर संबंधित यंत्रणा जर या विषयात गांभीर्याने लक्ष घालणार नसतील आणि आम्हा शेतकऱ्यांचा मोबदला तातडीने अदा करणार नसतील तर आम्ही आमच्या उपोषणाच्या भूमिकेवर ठाम आहोत. आणि त्याही पलीकडे जर प्रजासत्ताक दिनीही आम्हाला ठोस असे लेखी आश्वासन मिळाले नाही, तर आम्ही लोटे येथील सीटीपी प्लांट बंद पाडू, अशी ठोस भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे. भार्गव देवळेकर, अन्वर खान, वहाब सुर्वे, गुलजार सुर्वे, राजू रेडीज या शेतकऱ्यांना जवळपास 1 कोटी पेक्षा जास्त मोबदला मिळणे बाकी आहे.
हेही वाचा - Approval For Tamasha : लोककलावंतांची प्रतीक्षा संपली अन् तमाशाला परवानगी मिळाली