रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या पाठीमागचे शुक्लकाष्ठ काही संपताना दिसत नाही. कारण आता आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांचे एक प्रसिद्धीपत्रक सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. मात्र, या पत्रकाबाबत निवडणूक आयोगाची कोणतीही परवानगी किंवा ते पत्रक प्रमाणित करून न घेता व्हाट्सअॅपवर टाकण्यात आले. निवडणूक विभागाची परवानगी न घेता पत्रक परस्पर सोशल मीडियावर टाकल्याने त्यांना आयोगाने नोटीस बजावली आहे. लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १२७ (अ) चा भंग केल्याने १७५ (आय) अन्वये गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, असे नोटीसमध्ये म्हणण्यात आले.
दरम्यान, या पत्रकावर प्रकाशकाचे पूर्ण नाव नाही. या प्रचार पत्रकावर दिनांक २३ एप्रिल रोजी होणार्या मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ५ अशी चुकीची वेळ छापण्यात आली. परंतु मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेपर्यंत असताना त्यावर चुकीची वेळ छापण्यात आल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयातून देण्यात आली आहे.