रत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील अंगारकी यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी उद्या अंगारकी चतुर्थीला गणपतीपुळे देवस्थानाने गणपती दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भक्तगणांनी ऑनलाईन दर्शन घ्यावे, असे आवाहन देवस्थानाचे सरपंच डॉ. विवेक भिडे यांनी केले.
हेही वाचा - राजभाषा दिन विशेष... असे शिकले रत्नागिरीचे जिल्हाधिकारी 'मराठी'
गेल्या वर्षभरात नव्हती अंगारकी चतुर्थी
उद्या (दि. २ मार्च) अंगारकी चतुर्थी आहे. गणपतीपुळे येथे प्रत्येक संकष्टीला मोठी गर्दी होते. उद्या जवळपास पावणे दोन वर्षानंतर पहिलीच अंगारकी आहे. गेल्या वर्षभरात अंगारकी चतुर्थी नव्हती. त्यामुळे, या अंगारकीला गणपतीपुळेत मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र, करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यात्रोत्सव रद्द करण्याची सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देवस्थानाला करण्यात आली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत गणपतीपुळे देवस्थानाने यात्रोत्सव रद्द केला आहे. तसेच, गणपती दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑनलाईन दर्शन घेण्याचे आवाहन
अंगारकीला सर्वाधिक पश्चिम महाराष्ट्रातील लोक गर्दी करतात. त्यामुळे, अंगारकीच्या दिवशीची यात्रा, पालखी उत्सव देवस्थानाने रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, नियमित दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले. तसेच, भक्तगणांनी ऑनलाईन दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. ऑनलाईन दर्शन सुविधा पहाटेपासून गणपतीपुळे देवस्थानाच्या वेबसाईटवरून उपलब्ध करून दिली जाणार आहे. भक्तगणांनी ऑनलाईन दर्शन घ्यावे, असे आवाहन देवस्थानाचे सरपंच डॉ. भिडे यांनी केले. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे गणपतीपुळेत येणारा वर्ग कमी झाला आहे. त्यामुळे, पर्यटन व्यवसायात मोठी घट झाल्याचे तेथील व्यापारी सांगत आहेत.
हेही वाचा - रत्नागिरी शहरातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; एका महिलेसह दोघांना अटक