रत्नागिरी - जिल्ह्यात शिवसेना-भाजप युतीमध्ये वादाची पहिली ठिणगी दापोलीत पडली आहे. युतीमध्ये दापोलीची जागा शिवसेनेला सोडण्यात आली आहे. त्यात जिल्ह्यात भाजपच्या वाट्याला पाच पैकी एकही मतदारसंघ आलेला नाही. त्यामुळे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात भाजपला एकाही मतदारसंघात प्रतिनिधित्व मिळालेले नाही. रत्नागिरी, गुहागर प्रमाणे दापोलीची जागा भाजपला मिळावी अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. मात्र, युतीमध्ये दापोलीची जागा शिवसेनेला सोडण्यात आली आहे. शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. 3 ऑक्टोबरला ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान या जागेवर भाजपनेही दावा केला होता. मात्र, ही जागा भाजपला न मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. याबाबत सोमवारी दापोली विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत केदार साठे यांनी भाजप व अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल करावेत असे ठरवण्यात आले. त्यानुसार भाजप कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करत उपविभागीय कार्यालय दापोली येथे जात केदार साठे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केला.
केदार साठे यांनी 2014 साली भाजपकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 13 हजार मतं मिळाली होती. या मतांमुळे त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार सुर्यकांत दळवी यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादीचे संजय कदम निवडून आले होते. त्यामुळे आताची लढाई सुद्धा शिवसेनेसाठी सोपी नसणार आहे. त्यामुळे आता भाजप-शिवसेनेचे वरिष्ठ नेते स्थानिक भाजपची समजूत काढणार की ही बंडखोरी कायम राहणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.