रत्नागिरी - जिल्ह्यातील गणपतीपुळे मंदिर देखील सोमवारपासून भाविकांना दर्शनासाठी खुले झाले आहे. जवळपास 8 महिन्यानंतर मंदिर श्रींच्या दर्शनासाठी खुले झाल्याने राज्यासह देशभरातून भाविक इथे येत आहेत. मंदिरे सुरू करण्यास परवानगी देताना सरकारने काही अटी घातल्या होत्या. मंदिर प्रशासनाकडून या अटी-शर्थींचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. भाविकही मंदिर परिसरात नियमांचे पालन करत आहेत. मात्र बाहेर पडल्यानंतर खरेदी असेल किंवा समुद्रावर फिरणे असेल, इथे मात्र भाविक, पर्यटकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचा प्रकार समोर येत आहे.
- भाविकांनी मंदिरात येताना गर्दी करू नये, यासाठी दर्शन रांगेत रांगेत 5 फुटाचं अंतर ठेवण्यात आले आहे. त्यासाठी भाविकांना उभं राहण्यासाठी बॉक्स आखण्यात आले आहेत.
- मंदिरात मास्क बंधनकारक असून, मास्कशिवाय आतमध्ये प्रवेश नाही.
- प्रत्येकाचे तापमान तपासले जाते
- भाविकांना प्रवेशावेळी हातावर सॅनिटाईझर दिले जाते.
- व्हीआयपी दर्शनही बंद
- भाविकांना सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दुपारी 2 ते 7 या वेळेत श्रींचं दर्शन
- दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत मंदिर बंद करून संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण, मंदिर पुन्हा दर्शनासाठी दुपारी 2 ते सायंकाळी 7 वाजेपर्यत सुरू
- मंदिरात येताना दुर्वा, फुले आदी ओले साहित्य न आणता नारळ, सुका मेवा हा प्रसाद बंद पिशवीमध्ये पॅक करुन आणण्यास परवानगी आहे
- श्रींच्या मंदिरामध्ये पूजा, अभिषेक कोणत्याही प्रकारे होत नाहीत
भाविक पालन करतात की नाही?
श्रींच्या दर्शनासाठी येताना भाविक नियमांचं पालन करताना दिसत आहेत. मास्कचा वापर बंधनकारक असल्याने मास्क वापरतात. रांगेत आखून दिलेल्या बॉक्समध्ये उभं राहून दर्शनासाठी पुढे जातात. तापमान चेक करण्यास सहकार्य करतात. मंदिर परिसरात भाविक किंवा पर्यटकांकडून नियमांचे पालन होताना दिसत आहे.
मंदिर परिसराबाहेर उल्लंघन
मंदिर परिसरातून बाहेर पडल्यानंतर मात्र भाविक किंवा पर्यटकांकडून नियमांचं उल्लंघन होताना दिसत आहे. अनेक जण मास्क वापरताना दिसत नाहीत, तर खरेदी असेल किंवा समुद्रावर फिरणं असेल सोशल डिस्टनसींगच्या नियमांचं पालन करताना दिसत नाहीत.
तीन दिवसांत 12 हजारांहून अधिक भाविकांनी घेतलं दर्शन
दरम्यान तीन दिवसांत गणपतीपुळेत जवळपास 12 हजारांहून अधिक भाविकांनी श्रींचं दर्शन घेतले आहे. पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी 3 हजार 800, मंगळवारी 4 हजार 800 तर आज (बुधवार) संध्याकाळपर्यंत 3500 हून अधिक भाविकांनी श्रींचं दर्शन घेतले.