रत्नागिरी - पावस भाटीवाडी येथील गौतमी खाडीच्या किनाऱ्यावर मंगळवारी सकाळी अचानक मृत माशांचा खच आढळून आला. खाडीतील पाण्यामध्ये हिरव्या रंगाचा तवंगही दिसून येत होता. या घटनेची माहिती मिळताच मत्स्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. ओहोटीमुळे खाडीतील पाणी कमी झाले होते. कमी पाणी आणि वाढलेल्या उष्णतेमुळे माशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज मत्स्य व्यवसाय खात्याने वर्तवला आहे.
गौतमी खाडी व रनपारजेटीदरम्यान समुद्र किनारी भाटीवाडी परिसर आहे. अनेक मच्छीमार या भागात मासेमारीचा व्यवसाय करतात. येथील अनेक ग्रामस्थ मासेमारीवरच उदरनिर्वाह चालवतात. समुद्रातील अंतर्गत हालचाली व बदलामुळे समुद्र किनारी व खाडीतील पाण्यामध्ये बदल होऊन मासे मृत होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच मागील काही दिवसांपासून समुद्र किनाऱ्यावर हिरव्या रंगाचा तवंग आढळून आला आहे. काही दिवसांपूर्वी मांडवी, भाट्ये, आरेवारे, वरवडे आदी समुद्रकिनारी हिरव्या रंगाचा तवंग दिसून आला होता. मंगळवारी गौतमी खाडी किनाऱ्यावरदेखील अशाच हिरव्या रंगाचा तवंग आढळून आला.
मंगळवारी सकाळी खाडी किनारी दुर्गंधी पसरली होती. अनेक नागरिकांनी खाडी किनारी आल्यानंतर त्यांना किनाऱ्यावर मृत माशांचा खच आढळून आला. ही बातमी वाऱयासारखी गावात पसरल्यावर अनेकांनी खाडी किनारी धाव घेतली.
खाडीतील पाण्यावर हिरवा आणि निळसर रंगाचा तवंग दिसत होता. तातडीने पावसचे तलाठी भातडे यांनी खाडी किनारी जाऊन पावस, गणेशगुळे, कुर्धे, मेरवी, पुर्णगड परिसराला भेट दिली.