रत्नागिरी - दापोलीचे वनपाल गणेश खेडेकर यांना लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दापोलीच्या वनविभाग कार्यालयातील इसमास ५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. याप्रकरणी खेडेकर यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. लाकूड वाहतूक परवाना देण्यासाठी ही लाच घेण्यात येत होती.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने तोडलेल्या झाडांच्या लाकडांच्या वाहतुकीसाठी परवान्याची मागणी वनअधिकाऱ्यांच्या दापोली कार्यालयात केली होती. सदर परवाना देण्यासाठी दापोलीचे वनपाल गणेश खेडेकर आणि सचिन आंबेडे यांनी २० ऑगस्ट रोजी तक्रारदाराकडे १ हजार ३०० रूपये प्रमाणे ५ परवान्यांचे ६ हजार ५०० रूपये रकमेची मागणी केली. पंरतू या परवान्याकरिता शासकीय शुल्क शंभर रूपये असताना या दोन संशयितांनी केलेल्या मागणीची तक्रार संबंधित तक्रारदाराने रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती.
या तक्रारीनुसार, सापळा लावण्यात आला असता, वनपाल गणेश खेडेकर यांच्या सांगण्यानुसार इसम सचिन आंबेडेने तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच घेताना दापोली येथील वनविभागाच्या वनपाल कार्यालयात संध्याकाळी ४ वाजता रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रविण कदम, पोलीस हवालदार संतोष कोळेकर, पोलीस नाईक बिशाल नलावडे, पोलीस नाईक योगेश हुंबरे यांनी केली आहे.