रत्नागिरी- तालुक्यातील कुवारबाव येथे सोमवारी सकाळी एका दाम्पत्याने विहिरीत उडी मारली. यात नवऱ्याचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
रत्नागिरी शहरानजिक कुवारबाव येथे चप्पलचे दुकान चालवणारे परशुराम जनार्दन चव्हाण हे सोमवारी सकाळी पत्नी सरीतासह फिरायला गेले होते. जवळच असलेल्या एका शाळेजवळ ते आले असता त्यांनी तेथेच असलेल्या खोल विहिरीत उडी मारली. त्यांच्या पाठोपाठ पत्नी सरीतानेही उडी मारली. यात पतीचा जागेवरच मृत्यू झाला. तर सरीता गंभीर जखमी झाल्या.
घटनेची माहिती मिळताच आजुबाजूच्या लोकांनी तेथे गर्दी केली. कुवारबाव येथील श्री जय भैरी मित्रमंडळचे राजेश तोडणकर, सुशील आयवळे, रोहन मयेकर, अजित सावंत यांनी या दाम्पत्याला क्रेनच्या साहाय्याने विहिरीबाहेर काढून तत्काळ रुग्णालयात पाठवले.
मृत परशुराम जनार्दन चव्हाण हे एस.टी महामंडळात वाहक म्हणून काम करीत होते. नुकतीच त्यांनी निवृत्ती घेतली होती. परंतु, त्यांना निवृत्तीनंतरचे पैसे मिळाले नव्हते. एस.टी कडून फंड व अन्य प्रकरणात त्यांनी कोल्हापुरातील कामगार न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यांच्या घरात एक चिठ्ठी सापडल्याचीही माहिती पुढे येत आहे. त्यामध्ये आमचे कोणतेही धार्मिक विधी करू नये, असे म्हटले आहे. चव्हाण दाम्पत्याला एक विवाहित मुलगी आणि मुलगा आहे. चव्हाण यांचे कुवारबाव येथे चप्पलचे दुकान देखील होते. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.