रत्नागिरी - कोरोनाबाधित मृत रूग्णाच्या अंगावरील दागिने चोरीला गेल्याची घटना रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात घडली आहे. मृत महिलेच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याची तक्रार ही रूग्णाच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्यचिकित्सकाकडे केली होती. या तक्रारीची चौकशी केल्यानंतर दागिने चतुर्थ श्रेणी कंत्राटी महिला कर्मचाऱ्याने लांबवल्याचे समोर आले आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले.
संबंधिताला बडतर्फ करणार -
याविषयी माहिती देताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले की, जिल्हा रुग्णालयात मृत कोरोना रूग्णाच्या अंगावरील दागिने चोरी केल्याची माहिती मिळाली आहे. ही चोरी चतुर्थ श्रेणी कंत्राटी महिला कर्मचाऱ्यानी केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधिताला बडतर्फ करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्हा रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळात अहोरात्र मेहनत करत रूग्ण सेवा केली. पण, शनिवारी घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांत त्यांच्याबाबत नाराजीचा सूर दिसून आला.
हेही वाचा - सेल्फी बेतला जीवावर, गोसे धरणातून सोडलेल्या पाण्यात बुडाले सख्खे भाऊ