रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर (कसबा) येथील शास्रीपूलावरून कंटेनर थेट नदीत कोसळला. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली होती. दरम्यान नदीत पडलेला कंटेनर बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र कंटेनरचा चालक बेपत्ता असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सिमेंटची पोती भरलेला कंटेनर (Ka 29 B -6224) मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता. कंटेनर संगमेश्वरनजीकच्या कसबा शास्रीपूल येथे आला असता, चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे कंटेनर पुलावरून थेट नदीत कोसळला. कंटेनर नदीत कोसळताच परिसरातील ग्रामस्थांना मोठा आवाज ऐकायला आला होता. यानंतर ग्रामस्थांनी शास्रीपूलाकडे धाव घेतली. तोपर्यंत कंटेनर शास्री नदीच्या पाण्यात बुडाला होता. कंटेनर पुलावरून नदीत कोसळल्याची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक उदय झावरे, उपनिरीक्षक आबासाहेब पाटील, वाहतूक पोलीस निरीक्षक संतोष झापडेकर आदिंसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी चालक बेपत्ता असल्याचे त्यांना दिसून आले. लागलीच या सर्वानी बेपत्ता चालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली.
देवरूखमधील राजू काकडे हेल्प अॅकॅडमीच्या कार्यकर्त्यांना पाचारण करण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पाऊस खूप असल्याने व नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने रात्री 2 वाजता शोधकार्य थांबवण्यात आले. बुधवारी सकाळी 10 वाजता तहसिलदार संदीप कदम यांनी घटनास्थळी दाखल होवून परिस्थितीची पाहणी केली. तर कंटेनर नदीपात्रातून बाहेर काढण्यासाठी क्रेन मागवण्यात आल्यावर बुधवारी दुपारी कंटेनर बाहेर काढण्यात आला. या कालावधीत दोन्ही बाजूकडील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प होती. कंटेनर बाहेर काढल्यावर वाहतूक सुरू करण्यात आली. कंटेनर चालकाचा अद्यापही शोध लागलेला नाही.