रत्नागिरी - जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी जनआंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयराव भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी मोदी सरकार हाय हायच्या घोषणा देत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला.
हेही वाचा- भाजपची तटस्थ भूमिका? शिवसेना करणार सत्तास्थापनेचा दावा
जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी यावेळी मार्गदर्शन केले. तसेच मच्छिमार व शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. आर्थिक मंदी, वाढती बेरोजगारी, कर्जबाजारी शेतकरी, मच्छीमार हैराण झाले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे फटका बसला आहे. याखेरीज सर्वसामान्य जनतेलादेखील महागाईची झळ बसत आहे. यावेळी काँग्रेसच्यावतीने भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा निषेध करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अॅड. विजय भोसले, आमदार हुस्नबानू खलिपे, प्रसाद उपळेकर, हारिस शेखासन, बाळा मयेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
केंद्रात सरकार आणि गेली ५ वर्षे महाराष्ट्रात असलेल्या भाजपने आखलेल्या धोरणांमुळे देशातील जनतेला हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे मंदिची परिस्थिती निर्माण झाली आहे. बंद होणारे कारखाने त्यामुळे नोकऱ्या व तरुणांना कामधंदा न मिळाल्याने, तयार होणारी बेरोजगारी यामुळे देशातील तरुण या सरकारवर संतप्त आहेत. शेतीविषयक असणारी अन्यायकारक निती शेतकऱ्यांना न मिळणारा हमीभाव, शेतमालाची होणारी आयात यामुळे गेल्या एक वर्षात केवळ महाराष्ट्रात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. महाराष्ट्रात झालेल्या अकाली पावसामुळे एकूण ३२५ तालुक्यातील शेतऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत. याबाबत सरकारने अत्यंत तुटपुंजी मदत बळीराजाला करुन एकप्रकारे थट्टा केली आहे.
राज्याच्या किनारपट्टीवर मच्छीमारी करुन राहणारा गरीब मच्छीमार वादळामुळे हवालदिल व हतबल झाला आहे. त्याला या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्राने भरघोस मदत देणे गरजेचे असताना, याबाबत कोणतीही पावले उचलली नाहीत. मच्छीमार बांधवांचा सरकारकडून मिळणारा हक्काचा डिझेल परतावा गेली ५ वर्षे मिळाला नाही. तो मिळाल्यास तीच मच्छीमारांना मोठी मदत ठरेल. भाजप सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरलेले आहे. या सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाने संपूर्ण महाराष्ट्रात धरणे आंदोलन कार्यक्रम केला आहे. त्याचा भाग हे आंदोलन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन आमदार हुस्नबानू खलिपे यांनी केले.