रत्नागिरी - कोकणातील महत्त्वाचा सण म्हणून शिमगोत्सवाची ओळख आहे. आत्तापासून कोकणातील शिमग्याची चाहूल देणाऱ्या नमन स्पर्धा गावागावात रंगू लागल्या आहेत. दशावताराप्रमाणे लोककला म्हणून नमन खेळाकडे पाहिले जाते. सध्या गावागावात रंगिबेरंगी पोषाख, पौराणिक गाण्यांचे सुर आणि मृदुंगाच्या तालावर नमनाचे बोल कानावर पडत आहेत.
भजन, टिपरीनृत्य, दशावतार, गोमूचा नाच, तमाशा, किर्तन, भारूड यांच्यासोबत नमन ही कोकणातील पारंपारिक लोककला आहे. मात्र, या लोककलांना मंच मिळावा, यासाठी कोकणातील अनेक गावांमध्ये शिमगोत्सवाच्या आधी नमन स्पर्धांचे आयोजन केले जाते. नमन ही प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यामधील प्रसिध्द लोककला आहे. नमन हे झांजगी, खेळे या नावानेही ओळखले जाते. आता संगीत, प्रकाश, नेपथ्य, वेशभुषा यामुळे पारंपारिक नमनाला आधुनिकतेची झळाळी आली आहे. सध्या शिमगोत्सवाच्या आधी कोकणातील विविध खेड्यांमध्ये रात्री नमनाच्या स्पर्धा रंगत आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे पाडावेवाडीत शिमगोत्सवाच्या आधी गेल्या ३ वर्षांपासून नमनाची स्पर्धा आयोजित केली जाते. कोकणातील अनेक नमन मंडळे या पूर्वजांपासून चालत आलेला वारसा जपण्याचा प्रयत्न करत आहेत. लोककलेतून समाज प्रबोधन आणि लोकजागृती करणारी ही कला जोपासली गेली पाहिजे, हीच अपेक्षा कोकणवासीय व्यक्त करत आहे.