रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईवरून आता भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी गांधीगिरी पद्धतीने अनोखे आंदोलन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होत नसल्याचे सांगत प्रसाद लाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून सुपारी आणि नारळाचं झाड दिले.
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणची अपरिमित हानी झाली. या चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कोकणातल्या नुकसानग्रस्त बागायतदारांना सरकारने नारळाला २५० रुपये आणि सुपारीला ५० रुपये नुकसान भरपाईची मदत जाहिर केली आहे. मात्र ही नुकसान भरपाई अत्यंत तुटपुंजी असल्याचा आरोप करत भाजप आक्रमक झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांना रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्यामार्फत सुपारीचं झाड आणि नारळाचं झाड भेट देण्यात आले. रत्नागिरी दौऱ्यावर आलेले भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी तुटपुंज्या मदतीचा निषेध म्हणून मुख्यमंत्र्यांसाठी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे नारळ, सुपारीचे झाड सुपूर्द केले.
निसर्ग चक्रीवादळात संपूर्ण नष्ट झालेल्या सुपारी झाडाला ५० आणि नारळ झाडाला २५० रुपये प्रति झाड अशी विशेष बाब म्हणून वाढीव दराने मदत देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. ही क्रूर थट्टा आहे कोकणातल्या बागायतदारांची. वर्षानुवर्ष शिवसेनेच्या पाठिशी ठामपणे उभे राहणाऱ्या कोकणवासियांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे कामच हे सरकार करत आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो, असे लाड म्हणाले आहेत.
मातोश्रीच्या अंगणात मुख्यमंत्र्यांनी हि झाडे लावावी आणि त्यांची जोपासना करावी आणि खर्च येतो ते पाहावे, असा खोचक टोला प्रसाद लाड यांनी यावेळी लगावला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे 250 आणि 50 रुपयाची पाकिट देत सरकारच्या अनुदानाची लाड यांनी खिल्ली उडवली. तर, गणेशोत्सवासंदर्भात चाकरमान्यांचा कुठलाच निर्णय होत नसल्याने त्याबाबतही लाड यांनी नाराजी व्यक्त केली.