रत्नागिरी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (25 जुलै) पूरग्रस्त रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी चिपळूण पूर परिस्थितिचा आढावा घेतला. आता परिस्थिती निवळली असली तरी, पूरानंतर सावरण्यासाठी नागरिकांना मदतीची गरज आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज सलग दुसऱ्या दिवशी कोकण दौऱ्यावर आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर चिपळूण येथे पत्रकार परिषद घेतली.
सध्या जिवनावश्यक वस्तूंचा पूरवठा -
'पूरग्रस्तांना लवकरच आर्थिक मदत केली जाणार आहे. सध्या जिवनावश्यक वस्तू पाठवल्या जाणार आहेत. यात कपडे, वैद्यकीय सेवा आणि काही तात्पुरत्या लागणाऱ्या वस्तूंचा समावेश असेल. त्यामुळे सध्या आवश्यक असलेल्या गरजू वस्तूंची मदत केली जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
'लवकरच आर्थिक मदत जाहीर करणार'
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला आहे. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह अनेक भागातील लोक रस्त्यावर आली आहेत. तेथेही भेट देणार आहे. त्यामुळे लोकांना बरं वाटावं म्हणून मी सध्या कोणतीही घोषणा करणार नाही. सध्या फक्त तातडीच्या गरजेच्या वस्तूंची मदत केली जाईल. पूर परिस्थिचा संपूर्ण आढावा घेऊन, त्यात घरं, पिकं, दुकानं जे काही नुकसान झाले आहे याचा आढावा घेऊन लवकरच आर्थिक मदत जाहीर करणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. दरम्यान, अतिवृष्टीमुळे या भागात अतोनात नुकसान झाले आहे. तीन दिवसांपूर्वी कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. चिपळूण शहर पाण्यात बुडाले होते. मुख्य बाजारपेठा आणि नागरी वस्तीत सहा ते सात फूट पाणी शिरले होते.
हेही वाचा - पॉर्नसारखे प्रकरण कसे थांबतील यासाठी प्रयत्न असणार - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील