रत्नागिरी- मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कोकण दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार रिफायनरी बाबत सामानात आलेल्या जाहिरातीवर भाष्य करणे टाळले. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेबाबत संशयकल्लोळ आणखी वाढला आहे. दरम्यान, आपलं सरकार आकडेबाज नसल्याचे म्हणत त्यांनी भाजपचा चिमटा काढला.
हेही वाचा- सत्य बाहेर येईल म्हणूनच पवारांचा 'एनआयएला' विरोध - फडणवीस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून कोकण दौऱ्यावर आहेत. रायगडनंतर ते दुपारी गणपतीपुळे इथे दाखल झाले. श्रींच्या दर्शनानंतर गणपतीपुळे विकास आराखड्यातील विकासकामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री अॅड. अनिल परब, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, भास्कर जाधव, शेखर निकम, हुस्नबानो खलिफे, आदी उपस्थित होते.
भूमिपूजनानंतर गणपतीपुळे इथे जाहीर सभा झाली. या सभेत दोन दिवसांपूर्वी सामनात आलेल्या रिफायनरीच्या जाहिरातीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही बोलतील, अशी अनेकांना आशा होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. त्यामुळे या प्रकल्पाबाबत शिवसेनेची नेमकी भूमिका काय याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
गणपतीपुळे विकास आराखड्याचे अनावरण करायला मिळाले हे माझे भाग्य आहे. कोकणाबद्दल वेगवेगळी स्वप्न दाखविली गेली. मात्र, मी स्वप्न दाखविली नाहीत. मी तुमची स्वप्न पूर्ण करायला आलोय. तुम्हाला जे पाहिजे ते मी करुन देईन. जेवढा निधी लागेल तेवढा देईन. मी आकडा कधी लावलेला नाही. आकडा कधी खेळलेलो नाही आणि आकडा कधी बोललेलो नाही, आपलं सरकार हे आकडेबाज सरकार नाही, असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला.