रत्नागिरी - शहर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेचे उमेदवार प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी मंगळवारी १२ वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी, उद्योजक अण्णा सामंत, जिल्हाप्रमुख विलास चाळके, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, माजी शहर प्रमुख प्रमोद शेरे यांच्यासह शेकडो शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
राज्यातील सत्ता संघर्षानंतर आता स्थानिक पातळीवर देखील शिवसेना भाजप आमनेसामने येणार आहेत. रत्नागिरीत नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीनिमित्त सेना भाजपचा जंगी सामना रत्नागिरीत रंगलेला पहायला मिळणार आहे. २५ वर्ष स्थानिक पातळीवर गळ्यात गळे घालून सत्तेचा उपभोग घेणारे २ मित्रपक्ष राज्यातील सत्ता संघर्षानंतर आता स्थानिक पातळीवर देखील आमने-सामने उभे ठाकले आहेत.
हेही वाचा - कोकणवासीयांना खुशखबर.. ख्रिसमससाठी धावणार जादा ५ साप्ताहिक रेल्वे गाड्या
२९ डिसेंबर रोजी रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाची पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी मंगळवारी शिवसेनेचे उमेदवार प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, २९ तारखेला जे मतदान होईल त्या मतदानापैकी ७० टक्के मतदान हे शिवसेना उमेदवार बंड्या साळवी यांना होईल, असा विश्वास आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केला. तसेच, बंड्या साळवी विक्रमी मतांनी विजयी होतील, असा विश्वासही सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा - मॉडर्न पेंटॅथलॉन विभागीय शालेय स्पर्धेत रत्नागिरीच्या तनया आणि मधुराची राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड