रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, अजूनही नागरिक बाजारात गर्दी करताना दिसतात. चिपळूण बाजारपेठेत वाढणारी गर्दी लक्षात घेता चिपळूणचे पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन बारी यांनी आज सकाळी बाजारपेठेत जाऊन पाहणी केली. यावेळी अत्यावश्यक सेवेत नसलेली अनेक दुकाने उघडी दिसली. अशा दुकानदारांना शेवटची ताकीद देण्यात आली. अत्यावश्यक सेवा 11 मे पर्यंत आणि इतर दुकाने पूर्ण दिवस बंद ठेवण्याच्या सक्त सूचना यावेळी देण्यात आल्या.
हेही वाचा - 'माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी' अंतर्गत जिल्ह्यात आढळले नवे 85 कोरोनाग्रस्त
नियमांचा भंग करणाऱ्यांना सक्त ताकीद
कोरोनाचे रुग्ण सध्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. चिपळूण परिसरात कोविडचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत काही व्यापारी नियम पाळत आहेत, तर काही नियमांचा भंग करत आहेत, त्यामुळे बाजारपेठेत गर्दी होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूणचे उपविभागीय अधिकारी सचिन बारी यांनी आज बाजारपेठेत जाऊन पाहणी केली. बारी आणि नगर परिषदेच्या पथकाने नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली. त्यामुळे, अनेकांची धावपळ झाली. चिपळूण बाजारपेठ आणि गोवळकोट रोड येथील दुकानांचीही पाहणी करण्यात आली. तसेच, नियम भंग करणाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आली.
हेही वाचा - नाचता येईना अंगण वाकडे अशी राज्य सरकारची परिस्थिती - माजी आमदार बाळ माने