रत्नागिरी - जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे देशासह महाराष्ट्रातही मोठ्या संख्येने रुग्ण आहेत. या विषाणूने राज्यात अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण केलेली आहे. रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व ती उपाययोजना करत महाराष्ट्र सरकार राज्यातील जनतेचीही योग्य ती काळजी घेत आहे. सरकारकडून करण्यात आलेल्या मदतीच्या आवाहनाला अनेकजण सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या आणि सहकार क्षेत्रात अग्रेसर राहून नेहमीच सामाजिक भान जपणाऱ्या 'चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेनेही शासनाच्या या कार्यास हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी रुपयांचा धनादेश संस्थेचे चेअरमन सुभाषराव चव्हाण उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांच्याकडे सुपूर्द केला.
पतसंस्थेकडून मुख्यमंत्री साहय्यता निधीसाठी 1 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर पतसंस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपला दोन दिवसांचा पगार जिल्हा आपत्ती सहाय्यता निधीसाठी दिला आहे. याची रक्कम जवळपास 4 लाख रुपये इतकी आहे. हे दोन्ही धनादेश आज चिपळूणचे उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांच्याकडे संस्थेचे चेअरमन सुभाषराव चव्हाण तसेच संस्थेच्या मुख्य कार्यकारी स्वप्ना यादव यांच्या हस्ते आज सुपूर्द करण्यात आले.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव तसेच संस्थेचे संचालक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


प्रशांत यादव यांचीही 1 लाखाची मदत
नेहमी समाजकार्यात पुढे असणारे चिपळूणचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनीही जिल्हा पोलीस विभागासाठी मदत केली आहे. यादव यांनी एक लाखांची मदत केली असून हा धनादेश त्यांनी आज चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्याकडे यावेळी सुपूर्द केला. सध्या कोरोनाच्या लढाईत पोलीसही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.