रत्नागिरी - तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात किनारी भागात मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान नुकसान झालेल्या भागाची केंद्रीय पथकाकडून शनिवारी पाहणी करण्यात आली. नुकसान झालेल्या आंबा बागायतदारांसह मिरकरवाडा बंदरात नुकसान झालेल्या मच्छीमारांशी संवाद साधत समितीने भरीव मदत देण्याचे आश्वासन शेतकर्यांसह मच्छीमारांना दिले आहे.
तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती शनिवारी रत्नागिरीत दाखल झाली. यामध्ये पथकाचे प्रमुख आयएएस अधिकारी अशोककुमार परमार, केंद्रीय अर्थ विभागाचे संचालक अभय कुमार, केंद्रीय वीज बोर्डाचे अधिक्षक अभियंता जे. के. राठोड, केंद्रीय कृषी विभागाचे संचालक आर. पी. सिंग, कार्यकारी अभियंता देवेंद्र चापेकर, मत्स्य विभागाचे संशोधक अशोक कदम यामध्ये सहभागी झालेले होते.
![Central team inspects the damage caused by cyclone Tauktae in ratnagiri](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-rtn-01-kendriypathakpahani-viz01-mh10046_06062021083412_0606f_1622948652_164.jpg)
जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली बैठक -
चक्रीवादळात झालेल्या नुकसानीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्रीय पथकाने बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी वादळापूर्वी प्रशासनाकडून घेतलेली काळजी आणि त्यानंतर मदतीसाठी केलेले प्रयत्न याची माहिती दिली. तसेच आपत्कालीन परिस्थिती, भविष्यात राबविले जात असलेल्या प्रकल्पांचे प्रेझेंटेशन सादर केले. त्यात भूमिगत वीज वाहिनी प्रकल्प, शेल्टर प्रकल्प यांचा समावेश होता. दिलेल्या माहितीवर पथकातील अधिकार्यांनी समाधान व्यक्त केले.
![Central team inspects the damage caused by cyclone Tauktae in ratnagiri](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-rtn-01-kendriypathakpahani-viz01-mh10046_06062021083412_0606f_1622948652_546.jpg)
वादळातील बाधित बागायतदारांशी साधला संवाद -
बैठकीनंतर पथकाने वादळातील बाधित बागायतदारांशी संवाद साधला. रत्नागिरीतील कोळंबे येथील विश्वास सुर्यकांत दामले यांच्या बागेची पाहणी केली. यावेळी दामले यांनी सविस्तर माहिती या पथकाला दिली. याप्रसंगी बागायतदार दामले यांनी वादळामध्ये फळगळीने अधिक नुकसान झाले आहे. सध्या हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर झाली आहे. तुलनेत अधिक नुकसान आहे. त्यानुसार अपेक्षित केंद्राकडून मिळावी अशी मागणी केली. वादळातील नुकसानीचे फोटो आणि व्हिडिओ पथकाने बागायतदारांकडून घेतले. तुटलेली झाडे बागेत तशीच असल्यामुळे वादळावेळच्या परिस्थितीची कल्पना पथकला आली.
![Central team inspects the damage caused by cyclone Tauktae in ratnagiri](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-rtn-01-kendriypathakpahani-viz01-mh10046_06062021083412_0606f_1622948652_517.jpg)
मच्छीमारांशीही संवाद साधला -
त्यानंतर या पथकाने मिरकरवाडा येथील मच्छीमारांशी संवाद साधला. बोटीचे नुकसान कशाप्रकारे झाले याबाबत माहिती जाणून घेतली. दोन्ही घटकांशी संवाद साधल्यानंतर पथकाकडून केंद्र शासनाकडून भरीव मदत दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळ : रत्नागिरी जिल्ह्यासाठी 30 कोटी 72 लाख नुकसान भरपाई - उदय सामंत