रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील कुशिवडे गावातल्या जंगली भागात जिवंत गावठी बॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 18 बॉम्ब कुशिवडे गावातल्या जंगली भागात विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले. हे बॉम्ब ग्रामीण भागात खास जंगली डुकरांची शिकार करण्यासाठी वापरले जातात.
कुशिवडे गावचे ग्रामस्थ असलेले सागर तांदळे आणि निलेश शिगवण हे दोघेजण आपली जनावरे शोधण्यासाठी पोस्ताचा माळ या भागात गेले असताना त्यांना हे गावठी बॉम्ब विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती कुशिवडे गावच्या ग्रामस्थांनी गावच्या पोलीस पाटलांना देत सावर्डे पोलिसात तक्रार केली आहे. त्यामुळे सावर्डे पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनीही घटनास्थळी जात हे बॉम्ब ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे.