रत्नागिरी - रत्नदुर्ग किल्ल्यावरून 200 फूट खाली पडून मृत्यू झालेल्या तरुणीची ओळख पटली असून तिचे नाव दिशा मोहन इंगोले असे आहे. तिने आत्महत्या केली की यामागे घातपात आहे याबाबतचे गूढ मात्र कायम आहे. याबाबत पोलिसांचा सखोल तपास सुरू आहे.
रत्नागिरी शहराजवळील रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडल्याने 22 वर्षीय तरुणी गंभीर जखमी होऊन मृतावस्थेत सोमवारी सायंकाळी आढळली होती. ती किल्ल्यावरून खडकाळ भागात पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. तिचा एक पायही दुखावला होता. रक्तबंबाळ अवस्थेत ती सापडली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते. सुरुवातीला तिची ओळख पटलेली नव्हती. दरम्यान, तिची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. दिशा मोहन इंगोले असे तिचे नाव आहे. दिशा मूळची महाडमधील असून ती रत्नागिरीतील नवनिर्माण महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला शिकत होती. सोमवारी महाविद्यालयात जाण्यासाठी ती घरातून बाहेर पडली मात्र परत आलीच नाही.
मृत्यूचे गूढ कायम
सकाळी 11 वाजल्यापासून गायब असणारी ही तरुणी भगवती किल्ल्यावर नेमकी किती वाजता गेली? कुणासोबत गेली? तसेच तिने आत्महत्या केली की, ती घसरून पडली, ती एकटीच तेथे गेली होती की, तिच्यासोबत घातपात झाला? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. दरम्यान पोलिसांनीही तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.