रत्नागिरी - खडसे साहेबांच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्यापेक्षा खडसे साहेबांनी आत्मचिंतन करावं, असा सल्ला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी दिला आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.
भाजपचा त्याग केलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये एकाधिकारशाही असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही आरोप केले आहेत. याबाबत रत्नागिरीत आलेल्या भाजप नेते प्रसाद लाड यांना विचारलं असता, एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला आहे.
यावेळी लाड म्हणाले की, खडसे साहेब आता जिथे गेलेत तिथे त्यांना शुभेच्छा आहेत.पण आरोप करून जाणं हे अतिशय चुकीचं आहे. ज्या पद्धतीने पक्षाने त्यांचा सन्मान केला, पक्षाने त्यांना पदं दिली, खडसे साहेब म्हणतात मी 40 वर्ष पक्षासाठी दिली, पण या 40 वर्षात पक्षाने त्यांना भरपूर काही दिलं. त्यामुळे त्यांनी या पक्षाचा देखील सन्मान केला पाहिजे असं प्रत्युत्तर लाड यांनी दिलं आहे. तसेच खडसे साहेबांनी ज्या पक्षात काम केलं आहे , त्या पक्षाची परंपरा त्यांच्याकडे आहे. त्या पक्षाला एक राष्ट्रीय पक्षाचं स्थान आहे. त्यामुळे एकाधिकारशाही काय असते, ते आता त्यांना ज्या पक्षात ते जात त्या पक्षात गेल्यावर कळेल, माझीही खडसे साहेबांना विनंती आहे की, ज्या पक्षात ते जाताहेत त्या पक्षामध्ये राज्याचा विकास कसा होईल, स्वतःचा विकास कसा होईल त्याकडे लक्ष द्या, फक्त भारतीय जनता पक्षावर आरोप करणं, हल्ला करणं एवढ्यासाठी करू नये, असा टोलाही लाड यांनी लगावला आहे.