रत्नागिरी- जिल्ह्यातील भाजपच्या बंडोबांची समजूत काढण्यात भाजप श्रेष्ठींंना यश आले असून या बंडोबांचे बंड अखेर अखेर थंड झाले आहे. त्यामुळे चार विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या पाचही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष अॅड दीपक पटवर्धन यांनी भाजप-शिवसेना संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. भाजपच्या या बंडखोर उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेना उमेदवारांच्या वाटेतील मार्ग मोकळा झाला आहे.
हेही वाचा- पुणे जिल्ह्यात 'बंडोबा' होणार का 'थंडोबा'..?
जिल्ह्यात विधानसभेच्या पाच जागा आहेत. मात्र, यापैकी एकही जागा भाजपला न मिळाल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बंडाचा पवित्रा घेत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. राजापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे राजन साळवी हे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात भाजपच्या प्रसाद पाटोळे आणि संतोष गांगण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर गुहागर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले भास्कर जाधव हे महायुतीचे अधिकृत उमेदवार होते. त्यांच्याविरोधात भाजपचे उपजिल्हाध्यक्ष रामदास राणे तर चिपळूणमधील महायुती उमेदवार सदानंद चव्हाण यांच्याविरोधात भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष तुषार खेतल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
हेही वाचा- भुसावळ्यात सामूहिक हत्याकांडानंतर तणावपूर्ण शांतता; घटनास्थळी जमावबंदी लागू
दापोली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार योगेश कदम यांच्या विरोधात भाजपचे जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे या पाचही उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू होते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा या उमेदवारांशी संपर्क साधला होता. त्यामुळे सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी हे सर्व उमेदवार आपले अर्ज मागे घेतात का ? याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. सुरुवातीला राजापूरमधील प्रसाद पाटोळे आणि संतोष गांगण यांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यानंतर चिपळूणमधील तुषार खेतल, गुहागरमधील रामदास राणे तर दापोलीतील केदार साठे यांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. याचसंदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.