रत्नागिरी - यंदाच्या मच्छीमारी हंगामाला सुरुवात झाली आहे. आता बंपर मासळी मच्छिमारांना मिळू लागली आहे. रत्नागिरीत एका मच्छिमाराला आज पूर्ण होडी भरुन बंपर बांगडा मासा मिळाला आहे. 1 आँगस्टपासून मच्छिमारी हंगामाला सुरुवात होते. परंतु सुरुवातीलाच हवामानाचं विघ्न आल्यानं नौका समुद्रात झेपावल्या नव्हत्या. अद्यापही मोठ्या यांत्रिकी नौका समुद्रात मासेमारीसाठी गेल्या नाहीत. मात्र, छोट्या पारंपारीक नौकांची मासेमारी सुरु झाली असून बंपर मासळी त्यांना मिळू लागली आहे.
मिरकरवाडा बंदरातील अल्लाउद्दीन अब्दुला मजगावर या पारंपारिक मच्छिमाराला बंपर बांगडा मिळाला आहे. आज त्यांची पुर्ण होडी भरुन त्यांना बांगडा मासा मिळाला. जवळपास अडीच टन किलो मासे मिळाले. साधारण 150 ते 200 रुपये किलो बांगडा माशाचा दर सध्या सुरु आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात मासे मिळू लागल्यानं खवय्यांची मात्र आता चंगळ आहे.