रत्नागिरी- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लाॅकडाऊन आहे. लाॅकडाऊनमुळे बाजारात जीवनाश्यक वस्तूंची आवक मंदावली आहे. कोकणात भाजीपाल्याची आवक कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे येथून होत असते. मात्र, आवक मंदावल्याने काही ठिकाणी भाजीपाल्याच्या दरावर परिणाम झालेला आहे. खाऊच्या पानांवर देखील याचा परिणाम झाला आहे. आवक कमी झाल्याने यापूर्वी 25 ते 40 रुपये शेकडा मिळणारी पाने आज 80 ते 100 रुपयांपर्यंत गेली आहेत.
रत्नागिरीत पान खाणाऱ्यांची संख्या तशी मोठी आहे. मोलमजुरी करणारे लोक सर्रास पान, तंबाखू खातात. कोकणातल्या अनेक ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना पान खाण्याची सवय आहे. जिल्ह्यात कोल्हापूरमधून पानांची आवक होते. मात्र, सध्या पानांची आवक घटली आहे. त्यामुळे सहाजिकच पानाच्या ज्या करड्या बाजारात येतात त्यांचा दरही वधारला आहे.
500 ते 600 रुपयांना मिळणारी पानांची करडी आता 1500 रुपयांना किरकोळ विक्रेत्यांना मिळते. त्यामुळे साहजिकच यापूर्वी 5 रुपयांना 20 पाने मिळत होती आता फक्त 5 मिळत आहेत. त्यामुळे पान खाणाऱ्यांची पंचाइत होताना दिसत असून पान खरेदी करताना ग्राहक हात आखडता घेताना दिसतात. याबाबत पान विक्रेत्यांशी ईटिव्ही भारतचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी बातचीत केली.