रत्नागिरी - दापोली सीमाशुल्क (कस्टम्स) विभागाच्या गस्ती पथकाने सोमवार (दि. 29 मार्च) रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास मंडणगड तालुक्यातील कुंबळे-लाटवण मार्गावरील वलौतेजवळ मुंबईकडे जाणारे वाहन अडवून तपासणी केली. त्यावेळी त्यात सुमारे 2 हजार 500 किलो गोवंशाचे तसेच अन्य प्राण्याचे मांस आढळून आले. मुद्देमाल व दोन संशयितांना मंडणगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाचे अधीक्षक जे. एम. भोईटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गस्तीच्या वेळी कारवाई
याबाबत भोईटे म्हणाले, दापोली सीमाशुल्क विभागाकडून दररोज तस्करी विरोधात गस्त घातली जाते. काल (सोमवार) रात्री 12.30 वाजता आमचे गस्ती पथक मंडणगड तालुक्यातील कुंबळे ते लाटवण या भागात गस्त घालत होते. त्यावेळी वलौते गावाजवळ आमच्या पथकाला एक मालवाहू जीप (क्र. एम एच 01 सी व्ही 1360) संशयास्पदरीत्या आढळून आले. या वाहनातून दुर्गंधी येत होती तसेच रक्तही रस्त्यावर पडत असल्याने आम्ही ते थांबवले. या वाहनात काय आहे याची चालकाकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने आम्ही या वाहनाची तपासणी केली. त्यावेळी त्या वाहनातून पाणी व रक्त बाहेर पडत असल्याचे आढळले. वाहन चालकाकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी वाहनात गोवंशाचे व अन्य प्राण्याचे मांस असल्याचे सांगितले. आमच्या पथकाने या वाहन चालक व अन्य एका संशयिताला वाहनासह ताब्यात घेऊन दापोली येथे आणले. या वाहनाची तपासणी केली असता सुमारे 2 हजार 500 किलो मांस आढळून आले असून या वाहनात 2 कुर्हाडी, 4 चाकू, धार लावण्यासाठी 3 कानशी तसेच धार लावण्यासाठी दोन दगड आढळून आले ते जप्त करण्यात आले आहेत. जप्त मुद्देमाल व संशयित पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचेही भोईटे म्हणाले.
वाहनाबरोबर असलेले संशयित सईफ अस्लम कुरेशी (रा. कुर्ला, मुंबई) व इरफान अमीनुद्दीन कुरेशी (रा.गोवंडी, मुंबई) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 ते 12 गोवंशांची तसेच 2 ते 3 अन्य प्राण्यांची कत्तल करुन हे मांस मुंबई येथे या वाहनातून घेऊन चालले होते. मांस हे कुंबळे, वलौते परिसरातील मुनाफ या व्यक्तीकडून घेतले असून ते इम्रान या कुर्ला येथील व्यक्तीकडे पोहोचविणार असल्याचेही या दोन संशयितांनी सांगितले.
हेही वाचा - रत्नागिरीतील घरडा केमिकल्स दुर्घटनेतील मृतांचा आकडा पाचवर