रत्नागिरी- विविध मालवाहू जहाजांवर काम करणार्या कोकणातील अधिकारी, सीमेन्सना परत आणण्यासाठी भाजपचे कोकणातील नेते बाळ माने यांनी पुढाकार घेत डीजी शिपिंग व केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. कोकणात किमान पाच हजार सीमेन्स असून त्यातील बरेचजण नोकरीवर आहेत. कोरोना संकटकाळात हे सारेजण घरी परतून यावेत, अशी त्यांच्या नातेवाइक, कुटुंबियांची मागणी आहे. लवकरच ते परततील, याकरिता माने प्रयत्न करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत माने यांनी पत्रव्यवहार केला आहे. कोरोनाच्या संकटात मजूर, कामगारांना त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था सुरू आहे. परदेशात राहणार्या भारतीयांना परत आणले जात आहे. मात्र, समुद्रात बोटीवर नोकरी करणार्या सीमेन्सना आणण्यासाठी अद्याप व्यवस्था झालेली नाही. आंबा, काजू, मच्छीमारांच्या प्रश्नांची सोडवणूक करताना सीमेन्सचा प्रश्नही सोडवावा, अशी मागणी सीमेन्सच्या कुटुंबीयांनी माने यांच्याकडे केली आहे.
जहाजाच्या डेकवर कॅप्टन, चीफ ऑफिसर, सेकंड व थर्ड ऑफिसर आणि इंजिन विभागात चीफ इंजिनियर व सेकंड, थर्ड व फोर्थ इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनिअर, चीफ कुक यासह सीमेन्स काम करत असतात. एक लाख टनाच्या जहाजावर सुमारे 24 ते 25 अधिकारी, सीमेन्स काम करतात. सायनिंग ऑफ म्हणजे ड्युटी संपताना नेहमी जवळच्या बंदरात सोडण्याची व्यवस्था जहाज कंपनीतर्फे केली जाते. तिथून विमानाने गावी परत येण्याची सोय केली जाते. परंतु, कोरोना महामारीमध्ये विविध देश अडकले असून विमान वाहतूक बंद आहे.
सीमेन्सना कोकणात येण्यास खूप दिवस जाणार असल्याचे चित्र आहे. तपासणी, क्वारंटाइन होणे आदी अनेक अडचणी आहेत. त्याकरिता योग्य मार्ग लवकरच काढण्यासाठी बाळ माने यांनी डीजी शिपिंग व भारत सरकारकडे संपर्क साधला आहे.