रत्नागिरी - शालेय राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीच्या अविराज गावडेची महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली आहे. दिव-दमन येथे जानेवारी महिन्यात ही स्पर्धा होणार आहे.
हेही वाचा - INDvsWI 1st t20 : विंडीजचे भारतासमोर 208 धावांचे तगडे आव्हान, भारत 1 बाद 89 धावा
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महात्मा नगर क्रिकेट मैदान नाशिक येथे शालेय राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा झाल्या होत्या. पुणे विभागाचे नेतृत्व राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी भोसरी पुणे ३९ मधील कनिष्ठ महाविद्यालयाच्या १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने केले होते. या स्पर्धेत त्यांनी तृतीय क्रमांक संपादन केला.
या राज्यस्तरीय स्पर्धेतून महाराष्ट्र राज्याचा १७ वर्षाखालील मुलांचा संघ निवडला. त्यामध्ये संघातील सार्थक वाळके (कर्णधार) तिलक जाधव, रोहित चौधरी, सारीश देसाई व अविराज गावडे या ५ खेळाडूंची दिव-दमन येथे जानेवारी महिन्यात होणाऱ्या शालेय राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. अविराज अनिल गावडे हा रत्नागिरीचा उगवता क्रिकेटपटू असून सध्या तो पुणे येथे वेंगसरकर अकॅडमीमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहे.