रत्नागिरी - लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा केमिकल्स कंपनीत 20 मार्चला लागलेल्या भीषण आगीत गंभीर जखमी झालेल्या अभिजित कवडे यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. अभिजित कवडे यांनी नऊ दिवस मृत्यूशी झुंज दिली, उपचार सुरू असतानाच रविवारी रात्री 11.30वाजता नवी मुंबईतील रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.
9 दिवस मृत्यूशी झुंज
लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा केमिकल्स या कारखान्यात शनिवार 20 मार्च रोजी सकाळी आग लागून चार जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत अभिजित कवडे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ नवी मुंबई (ऐरोली) येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. 70 टक्के भाजलेल्या अभिजित कवडे यांनी मृत्यूशी झुंज दिली. नऊ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. सुरवातीला त्यांच्याकडून चांगला प्रतिसादही मिळाला होता. मात्र गेल्या दोन दिवसांत त्यांची प्रकृती खालावली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची संख्या आता 5 झाली आहे.
परिसरात हळहळ
अभिजित कवडे घरडा केमिकल्समध्ये संशोधन अधिकारी म्हणून 2008 पासून कार्यरत होते. त्यांचे एम. एस्सीपर्यंत शिक्षण झाले होते. शहरातील पाग नाका येथील मधुबन पार्क येथील रहिवासी असलेले कवडे यांचे मुळ गाव चिपळूण तालुक्यातील कुटरे आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, ५ वर्षीय मुलगी , दीड महिन्याचा मुलगा , आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. अभिजित कवडे यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.