रत्नागिरी - राज्याचे परिवहन मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी मनसेच्या बदललेल्या भूमिकेवर टीका करत मनसेला टोला लगावला आहे. मनसेचा पूर्वीचा झेंडा हा विविध धर्मीयांना आकर्षित करण्यासाठी वापरला होता, त्याचे काय झाल? असा सवाल त्यांनी मनसेला केला. तसेच कोणी नाव घेतल्याने हिंदूहृदयसम्राट होत नाही, आणि झेंडा घेतला म्हणून हिंदूंची मत फिरत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
दरम्यान नाईट लाईफवरून शिवसेनेवर टीका करणाऱ्या खासदार नारायण राणे यांनाही पालकमंत्री अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राणेंनी किमान कायदा सुव्यस्थेवर तरी बोलू नये, नाईट लाईफ संकल्पना नेमकी काय आहे, ते समजून घ्या, असा टोला परब यांनी लगावला आहे.
नाईट लाईफ हा शब्द चुकीचा असून मुंबई 24 तास हा त्याचा शब्द आहे. नाईट लाईफ म्हणजे चैनीखोरपणा हे विरोधकांनी डोक्यात घुसवले आहे. मुंबई 24 तासमध्ये बारच्या नियमात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे कायदा सुव्यस्थेवर नारायण राणेंनी न बोललेलंच बरं, राणे काय बोलतात ह्यापेक्षा सरकार काय बोलते, हे महत्त्वाचं असल्याचे परब यांनी सांगितले.
- पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचा शुभारंभ; मात्र, चव घेणे टाळले
रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते शिवभोजन आहार योजनेचा शुभांरभ जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे करण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांनी स्वतः थाळींचे वाटपही केले. मात्र, पालकमंत्र्यांनी स्वतः या जेवणाची चव घेतली नसल्याचं यावेळी दिसून आले.
रत्नागिरी येथे जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालय, हॉटेल मंगला, एसटी बस स्थानक जवळ आणि रेल्वे स्टेशन, रत्नागिरी अशा ठिकाणी नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. प्रत्येक ठिकाणी 100 थाळी दुपारी 12 ते 2 या वेळेत उपलब्ध होणार असून या शिवभोजन थाळीची किंमत फक्त 10 असणार आहे. गरीब, गरजू, सर्वसामान्य व्यक्तींची भूक शमविण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, जिल्हा परिषद रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे, अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.