रत्नागिरी - आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पर्ससीन मच्छिमारांनी एकत्र येत ऑल इंडिया पर्ससीन असोसिएशन महाराष्ट्रची स्थापना केली असून आज रत्नागिरीत याबाबतची घोषणा करण्यात आली. यावेळी गणेश नाखवा, अमोल रोगे, अनंत बुरांडे, नासिर वाघू, विजय खेडेकर, बिलाल सोलकर, नासिर वाघू, विकास सावंत, अशोक सारंग, अनंत केळुस्कर यांच्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि मुंबईतील मच्छिमार उपस्थित होते.
गेले काही महिने कोकणात पर्ससीन जाळेधारक मच्छिमार आणि पारंपरिक मच्छिमार वाद विकोपाला गेला आहे. त्यातच शासनाने गेल्या काही वर्षांत पर्ससीन मच्छिमारांवर अनेक निर्बंध घातले आहेत. त्यामुळेच आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पर्ससीन मच्छिमार आक्रमक झाले असून या सर्वांनी एकत्र येत 'ऑल इंडिया पर्ससीन असोसिएशन महाराष्ट्रची' स्थापना केली. यामध्ये 22 जणांचा समावेश असून, मुंबईतील 5, रायगड 5, सिंधुदुर्ग 5 आणि रत्नागिरीतील 7 जणांचा समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, दीव-दमन (केंद्रशासित प्रदेश) या राज्यांमध्ये पर्ससीन मच्छिमार मोठ्या प्रमाणात असून या सर्वांना एकत्र घेऊन महाराष्ट्राची ही संघटना देशपातळीवर लढा उभारणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
दरम्यान सर्व पर्ससीन/मिनी पर्ससीनद्वारे मासेमारी करणाऱ्या नौकाधारकांना एकत्रित करून त्यांच्या हक्कांसाठी देशभर लढा उभारणे.पर्ससीन मासेमारीस महाराष्ट्र सरकारने जे निर्बंध घातलेत, त्याबाबत शासन दरबारी आवाज उठवून त्यात शिथिलता मिळवून देणे. संपूर्ण देशात मासेमारीचे एकच धोरण ठरविण्यास भारत सरकारला विनंती करणे. शासनाच्या मासेमारी संदर्भातील प्रत्येक धोरणात्मक निर्णयात पर्ससीन असोसिएशनला समाविष्ट करून घेणे. सभासदांच्या कुठल्याही नावेवर शासनाने चुकीची व आकसापोटी कारवाई केल्यास शासकीय अथवा कायदेशीर पातळीवर मदत करणे. नैसर्गिक अथवा आकस्मिक दुर्घटनेत प्रत्येक सदस्यास तत्काळ मदत मिळवून देणे.पर्ससीन नेटच्या जहाज बांधणीकरीता विशेष आर्थिक साहाय्य मिळावे, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणे. भारत सरकारच्या EEZ (ई ई झेड) मध्ये पर्ससीनधारकांना मासेमारी करण्याचा हक्क मिळवून देणे. शासन दरबारी वेळोवेळी कायद्यात होणारे बदल, जीआर नोटिफिकेशन, खात्याचे खुलासे, सरकारी योजना याची संपूर्ण माहिती सभासदांना उपलब्ध करून देणे. अशा अनेक गोष्टी ऑल इंडिया पर्ससीन असोसिएशन महाराष्ट्रकडून करण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे सदस्य गणेश नाखवा, अशोक सारंग यांनी दिली.