रत्नागिरी - लोकसभा निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अजिंक्य गावडे यांनी परस्पर काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे हिंदू महासभेचे अजिंक्य गावडे यांची हिंदू महासभेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसच्या धोरणांना हिंदू महासभेचा विरोध कायम असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस फुटीरतावादाला खतपाणी घालणारा पक्ष असल्याने त्यांना पाठिंबा देणाऱ्या गावडेंची हकालपट्टी करण्यात आली असल्याचे हिंदू महासभेने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
हिंदू महासभेची उमेदवारी भरल्यानंतर तांत्रिक कारणास्तव अजिंक्य गावडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. माघार घेतल्यानंतर त्यांनी काँग्रेसभवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांना पाठिंबा जाहीर केला होता. सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा हा पक्ष असल्याने हा पाठिंबा देत असल्याचे गावडे यांनी म्हटले होते. यावर हिंदू महासभेने प्रसिध्दी पत्रक देऊन गावडेंची पक्षातूनच हकालपट्टी केली असल्याचे राष्ट्रीय संघटनमंत्री दिनेश भोगले यांनी जाहीर केले आहे.
त्याबरोबरच सर्वधर्म समभावाचे थोटांड माजवणाऱ्या काँग्रेसच्या विरोधात प्रचार करणार असल्याचे महासभेच्या संघटनमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली.