रत्नागिरी - जिल्हा आरोग्य यंत्रणेचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रायपाटण कोविड सेंटरमधून सहा दिवसांनी उपचार घेऊन परतणा-या तीन वयोवृध्द रूग्णांना घरी न सोडता वाटेतच सोडून ही अॅम्बुलन्स परत गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जिल्ह्यात मोठया प्रमाणात कोरोना रूग्ण वाढत असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याबाबत गंभीर नसल्याची दिसून येत आहे.
अर्ध्या रसत्यातच सोडले
आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाचा फटका रायपाटण कोविड सेंटरमधून उपचार घेऊन बाहेर आलेल्या तीन वृध्द रूग्णांना बसला आहे. हे रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यांच्यावर सहा दिवस रायपाटण येथे उपचार करण्यात आले. व गुरूवारी त्यांना सोडण्यात आले. मात्र, त्यांना घरी सोडण्याची आरोग्य प्रशासनाची जबाबदारी असताना त्यांना ओणी पाचल मार्गावरील ओणी गोरूलेवाडी स्टॉपवर सोडण्यात आले. या ठिकाणी हे तीन वृध्द रूग्ण आपल्या गावी जाण्यासाठी येणा-या जाणा-या वाहनांना हात दाखवत होते. मात्र, लॉकडाऊनमुळे दिवसभर या रूग्णांची अक्षरशा परवड झाल्याचे पाहायला मिळाले.
वृद्ध रुग्णांची गाडीसाठी वाट
रायपाटण येथून उपचार घेऊन आलेले हे रूग्ण गाडीसाठी वाट पाहत थांबले असताना गोरूलेवाडी येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने त्यांच्याशी संवाद साधला. तेव्हा त्यांना ते कोविड रूग्ण असल्याचे समजले. उपचारानंतर रायपाटण येथून त्यांना गोरूलेवाडी येथे सोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले, सध्या हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.