रत्नागिरी - गणेशोत्सवासाठी मुंबईतला चाकरमानी अगदी हमखास आपल्या गावी येतोच. मात्र या काळात खासगी ट्रॅव्हल्सधारकांकडून प्रवाशांची लुट होत असते. एसटीच्या दीडपट जादा तिकिट आकरण्यास त्यांना परवानगी आहे, मात्र हंगाम लक्षात घेऊन खासगी ट्रॅव्हल्सधारकांकडून आव्वाच्या सव्वा भाडं आकारालं जातं. अशा खासगी ट्रॅव्हल्सधारकांवर आरटीओ आणि पोलिसांमार्फत करडी नजर राहणार आहे. प्रवाशांची लुट केली जात असेल तर फसवणुक आणि मुंबई मोटार अॅक्टप्रमाणे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती माहिती, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ते म्हणाले की, कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना 10 दिवसाचा क्वारंटाईन कालावधी करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून ग्रामपंचायत आणि ग्राम कृती दलांना पत्र दिले जाणार आहे. तसेच पुणे , कोल्हापुर मार्गे रत्नागिरीत येणाऱ्या चाकरमन्यांना टोल फ्री करावा अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे . जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या चाकरमान्यांची क्वारंटाईन साठी सुविधा करण्यात आली आहे . तेथे आयुर्वेदीक डॉक्टर , खासगी डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे. कोरोनाचा प्रदुर्भाव वाढत असल्याने खासगी 27 डॉक्टरांची मदतीसाठी यादी तयार केली आहे. त्यांच्याशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.