रत्नागिरी- नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ आज कोकण जनकल्याण प्रतिष्ठानातर्फे राजापुरातील डोंगर तिठा येथे जाहीर सभा घेण्यात आली. प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेने सभा घेतली होती. या सभेला उत्तर देण्यासाठीच ही सभा आयोजित करण्यात आल्याचे समजले आहे. सभेत इतर संघटना देखील सहभागी झाल्या होत्या.
सभेत रिफायनरी समर्थनाचा ठराव देखील करण्यात आला. कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यांनी प्रकल्पाच्या समर्थनात ठराव मांडला. संघटनेचे सचिव अविनाश महाजन यांनी हा ठराव वाचून दाखविला आणि उपस्थित असलेल्या सर्वच समर्थकांनी हात उंचावून या ठरावाला पाठींबा दिला. या प्रकल्पाच्या समर्थनासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच या प्रकल्पासाठी जागा देऊ इच्छिनारे स्थानिक जमीन मालकही उपस्थित होते. त्याचबरोबर, भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही या सभेला उपस्थित होते.
विशेष म्हणजे, सिंधुदुर्गातील भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, रत्नागिरी भाजपचे अध्यक्ष अॅड. दिपक पटवर्धन, राष्ट्रवादीचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस कुमार शेट्ये, मिलिंद किर, शिवसेनेचे कारवाई झालेले पदाधिकारी तसेच अन्य कार्यकर्त्यांनी या जाहीर सभेला हजेरी लावली. या सभेत जनहीत संघर्ष समिती, नाणार, रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प समिती, राजापूर तालुका व्यापारी संघ, राजापूर तालुका प्रकल्प समन्वय समिती, कात्रादेवी कला क्रीडा मंडळ, कात्रादेवी गिरेश्वर पर्यटन सहकारी संस्था, व्यापारी संघटना, रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशन, राजापूर तालुका बार असोसिएशन, राजापूर तालुका डॉक्टर्स असोसिएशन या संघटना सहभागी झाल्या होत्या.
हेही वाचा- खासदारांच्या इशाऱ्याला न जुमानता शिवसैनिकही रिफायनरी समर्थनाच्या सभेत