रत्नागिरी - चिपळून तालुक्यातील तिवरे धरण फुटलं आणि हाहाकार माजला. मात्र, यात बऱ्याचजणांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये पोफळी आणि कोडफणसवणेतील ४ जिवलग मित्रांवरही काळाने घाला घातला. तिवरेगावात मित्राकडे जेवणाच्या निमित्ताने हे चारहीजण गेले होते. नियतीचा फेरा कसा चुकत नाही आणि घडणारं घडतंच. हे ४ मित्रांच्या उदाहरणातून पाहायला मिळते.
सुनिल पवार, रणजित काजवे, राकेश घाणेकर (तिघेही पोफळी) आणि सुमित निकम (कोंडफणसवणे), अशी या चार मित्रांची नावे आहेत. तिवरे आणि पोफळीतील अंतर फक्त ३० किलोमीटर इतके आहे. सुनिल पवार याचा मित्र चव्हाण याच्या तिवरे येथील घरी जेवणाच्या निमित्ताने सुनिल पवार, रंजित, राकेश आणि सुमित हे चौघेही गेले होते. त्यांच घर तिवरे धरणाला लागूनच होतं. या चौघांपैकी रणजित काजवे यांचा शोध अद्याप लागला नाही. त्यांचे कुटुंबीय त्याच्या परतण्याची वाट पाहत आहे.
सुनिल, रणजीत, राकेश हे तीघे मोलमजुरीकरून आपला उदरनिर्वाह करत होते. सुनिल पवार हा अविवाहित होता. त्यांना चार भाऊ आहेत. एकत्र कुटुंबात ते राहत होते. त्याच्या जाण्याने पवार कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. सुनिलचा भाऊ संजय रुग्णालयात आपला भाऊ गेला, यावर विश्वास ठेवायला तयार नाही. पोफळी गावातील एकाच वाडीतील हे चौघे मित्र या दुर्देवी घटनेत गेले याचे दुख त्यांच्या परिवाराला आणि त्यांच्या वाडीतल्या अनेकांना सलत आहे. त्यामुळे अनेक मित्र सखे सोयरे त्यांच्या आठवणीने रडतायत. अनेकांच्या अश्रुंचा बांध फुटतोय.