रत्नागिरी - कोरोनामुळे अडचणीत आलेल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पोस्ट खाते धावून आले आहे. पोस्टाच्या माध्यमातून राजापूर तालुक्यातून तब्बल 155 आंबा पेट्या वाशी मार्केटमध्ये पाठविण्यात आल्या आहेत. राजापूर तालुक्यातील नाणार सब पोस्ट कार्यालयाचे पोस्टमास्तर संदीप प्रभुदेसाई यांनी हा अभिनव प्रयोग राबविला असून, पोस्टाच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारे पोस्टामार्फत आंबा पाठविण्यात आला आहे.
सध्या आंबा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे तयार झालेला आंबा मोठ्या मार्केटमध्ये पाठवताना शेतकऱ्यांना खूपच कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पोस्ट खाते धावून आले आहे. राजापूर तालुक्यातील नाणार सब पोस्ट कार्यालयाचे पोस्टमास्तर संदीप प्रभुदेसाई यांनी पोस्टाचे टपाल घेऊन येणाऱ्या व्हॅनमधून आंबा मुंबईतील वाशी मार्केटमध्ये पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी टपाल खात्याची रितसर परवानगी घेतली आणि शेतकऱ्यांचा 155 पेट्या आंबा वाशी मार्केटमध्ये पाठविला.
आंबा पोस्टाच्या माध्यमातून पाठविण्यासाठी 1 पेटीसाठी 150 आकारण्यात आले. त्यामुळे पोस्ट खात्याला 22 हजार 500 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पोस्टाची ही सेवा लॉकडाऊन संपेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांनाही दिलासा मिळाला आहे. दरम्यान पोस्टाच्या इतिहासात पहिल्यांदाच पोस्टाच्या माध्यमातून आशा प्रकारे आंबा वाहतूक करण्यात आली आहे. त्यामुळे हा उपक्रम राबविणारे पोस्टमास्तर संदीप प्रभुदेसाई यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.